शहीद मॅरेथॉन स्पर्धेत धावले मिरजकर
सांगली, दि. 9,: आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मिरज तालुका प्रशासन आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहिद मॅरेथॉन स्पर्धेस मिरजकरांनी सहभाग घेत मोठा प्रतिसाद दिला. डॉ. माळी इंग्लिश स्कूल जवळील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आयोजित शहिद मॅरेथॉन स्पर्धेत मिरज तालुक्यासह जिल्हाभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. मॅरेथॉनची सुरूवात स्पर्धेत सहभागी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली.
रिमझिम पाऊसाचा आनंद घेत तब्बल हजारो स्पर्धक धावले. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर, प्रसिध्द त्वचारोगतज्ञ्ज डॉ. अशोक माळी, गटशिक्षणाधिकारी डॉ. सुरेश माने, नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, उमेश कोळी, श्री. तोडकर आदि उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मिरज तालुका प्रशासनाकडून आजपासून दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याची सुरूवात आज मॅरेथॉनने झाली. डॉ. अशोक माळी इंग्लिश स्कूलने कार्यक्रमानंतर अल्पोपहारासह फळांचे वाटप केले. या स्पर्धेत जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. कडेगाव तालुक्यातील आसद गावच्या सुनंदा भास्कर पाटील या आजीबाईंनी धावण्यामध्ये सहभाग घेत स्पर्धकांचे लक्ष वेधले होते. स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्यांना प्रशस्तीपत्र, शिल्ड देऊन त्यांचा जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, तहसीलदार दगडू कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी सत्कार केला.

