21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

0 झुंजार झेप न्युज

-आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून 25 लक्ष रुपयांची घोषणा

चंद्रपूर,दि.6: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याच्‍याच एक भाग म्‍हणजे 21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद असून नागरिकांना सुख, समाधान, यश, भरभराटी लाभो, अशा शुभेच्‍छा सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

चंद्रपुर तालुक्यातील आरवट या गावी वित्त आयोगाच्‍या निधीतून मंजूर शुध्‍द पाणी देणा-या आरो मशीनचे उदघाटन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी 25 लक्ष रूपयांच्‍या निधीतून विविध विकासकामांची घोषणा केली. मंचावर देवराव भोंगळे, सरपंच सुलभा भोंगळे, उपसरपंच अलका कवठे, नामदेव डाहूले, ब्रिजभूषण पाझारे, राहूल पावडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, विकास जुमनाके, माजी सरपंच वंदना पिंपळशेंडे, रणजित डवरे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सचिव रंजना मुळे, बबन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

शिक्षणाच्‍या माध्‍यमातून महापुरूषांच्‍या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्‍हटले आहे. महात्‍मा फुलेंनी ‘विद्ये विना मती गेली’ असे तर महात्‍मा गांधी यांनी पुस्‍तक जगातला सर्वात चांगला मित्र आहे, असे म्‍हटले आहे. आरवट या गावात शिक्षणाची उत्तम सुविधा निर्माण होण्‍याकरीता जिल्‍हा परिषद शाळेच्‍या माध्‍यमातून कार्य करण्‍यात येईल. गावातील विकासकामांमध्‍ये लहान मुलांसाठी खेळणी, बंदिस्‍त नाली तसेच इतर कामांना पहिल्‍या टप्‍प्‍यात माझ्या स्‍थानिक विकास निधीतून 25 लक्ष रूपये मंजूर करून कामे तात्‍काळ सुरू करण्‍यात येतील. तसेच शेती, शिक्षण, जलसंधारण, आरोग्‍य, रोजगार या क्षेत्रामध्‍ये सुध्दा कामे करण्‍यात येईल. आरवट येथील भजन मंडळाला नवीन साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. राज्यामध्ये नवीन सरकार येताच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्‍हणाले.यावेळी श्री. मुनगंटीवार यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.