महापालिकेच्यावतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले.

0 झुंजार झेप न्युज

महापालिकेच्यावतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड,दि.10: मागील जनसंवाद सभेमध्ये सुचना केलेली कामे पुर्ण केल्याबद्दल नागरिकांकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ह क्षेत्रीय कार्यालयात आज झालेल्या जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांना महापालिकेच्या संबंधित असलेल्या तक्रारी अडचणी लवकरात लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते. 

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ४३ तक्रारवजा सूचनांची नोंद झाली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ११, ४, २, ५, २, ४, ८ आणि ७ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते. 

आज संपन्न झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी आणि सूचना मांडल्या. यामध्ये शहरात डासांची संख्या वाढल्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अनाधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात यावी, बसथांब्यांचे नुतनीकरण करण्यात यावे, ओपन जिमच्या साहित्यांची दुरूस्ती करण्यात यावी, पदचारी मार्गावर होणारे अतिक्रमण हटवावे, शहरात वाढणाऱ्या रहदारीचे योग्य नियोजन करावे, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरूस्त करण्यात याव्यात, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.

जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वयक ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढविण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.

जनसंवाद सभेकरिता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. शहरात होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.