उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

0 झुंजार झेप न्युज

शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा-अजित पवार

पुणे,दि.24: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

श्री.पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्या नीटपणे वापराव्यात. घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि श्री गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.