गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने जल्लोषात स्वागत..

0 झुंजार झेप न्युज

गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने जल्लोषात स्वागत..

पिंपरी चिंचवड,दि.28: पारंपरिक ढोल ताशा पथक, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, आकर्षक रथ सजावट अशा विविध स्वरूपात उत्साहाच्या वातावरणात भोसरी येथे जल्लोषात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ महापालिकेच्या वतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये प्रमुख २० गणेश मंडळांचा समावेश होता. 

यावेळी आमदार महेश लांडगे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता महेश कावळे, प्रशासन अधिकारी नाना मोरे, तसेच माजी नगरसेविका भिमाताई फुगे, माजी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्वर ढवळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक भास्कर जाधव, पोलीस निरिक्षक संजय तुंगार, अशोक केंद्रे आदींनी या मंडळांचे स्वागत केले. महापालिकेच्या कर्मचा-यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले.

मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोलताशांच्या गजरात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी अशा शिवकालीन साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आले. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कला व क्रीडा पथकांच्या प्रतिनिधींचा सन्मान देखील यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आला. ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, मुर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. शहरातील विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सर्व प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करुन अधिकारी कर्मचा-यांना विविध सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, आरोग्य पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.