हातभर प्रश्नाला बोटभर इलाज लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी मतदान करावे -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
रत्नागिरी,दि.06: हातभर प्रश्नाला बोटभर इलाज असा संदेश लिहून स्वाक्षरीत करतानाच देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामर्थ्य मताचे युवा मतदारांशी एक विधायक सुसंवाद हा मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आज झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, देशाचे भवितव्य तरुणाईच्या हातात आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत असले पाहिजे. उत्तम नागरिक होण्याचे धडे, कुटुंब संस्था आणि शिक्षण संस्थांमधून मिळते. समतेचे लोकशाही मुल्य घरातून अमलात आणले पाहिजे. त्यानंतर शिक्षण संस्थेमधून लोकशाही मुल्यांचे धडे दिले जातात. एकही विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार नाही, असा चंग महाविद्यालयाने बांधला पाहिजे. आपल्या अधिकाराचा आपण वापर केला नाही तर तो केव्हा गमावून बसतो हे कळत नाही. त्यासाठी आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत मोठया संख्येने सहभागी व्हावे.
यांनतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री. देशपांडे यांनी उत्तरे देत सर्व शंकांचे निरसन केले. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, मतदानाचे कर्तव्य जबाबदार नागरिक म्हणून तुमचे सर्वांचे आहे, या विषयावर गंभीरतेने विचार करा. ईव्हीएमच्या जनजागृतीसाठी महाविद्यालयात होणाऱ्या चुनाव पाठशाळेत सहभागी व्हावे. मतदान करणे आपले कर्तव्य आहे, त्याचे महत्व समजून घ्या आणि अधिकाधिक मतदान करुन जागृत नागरिक बना.
यावेळी प्राचार्य डॉ. कुलकर्णी, युवा मतदार ब्रँड अम्बॅसिडर संकेत चाळके, तृतीयपंथी पल्लवी माने-परब, शिव छत्रपती पुरस्कार विजेती अपेक्षा सुतार, वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम विजेती मनस्वी नाटेकर यांनीही मनोगत व्यक्त करुन मतदान करण्याबाबत आवाहन केले.
यावेळी निबंध, पोस्टर्स, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धेतील विजेतांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. लोकशाही आणि तरुणाई या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतील विजेती मनस्वी नाटेकर हिला यावेळी युवा मतदार ब्रँड ॲम्बेसिडर प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
श्री. देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मी मतदान करणारच, मत द्यायला जायचे आहे आपले कर्तव्य बजावयाचे आहे. आमचे कर्तव्य आमची जबाबदारी, मतदान करणार आजची तरुणाई असे संदेश लिहिलेले पाट्यांचे फुगे यावेळी आकाशात सोडण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविक तर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थींनी, नागरिक, दिव्यांग, मुकबधिर, तृतीयपंथी मोठया संख्येने उपस्थित होते.

