लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; छाननीअंती 56 नामनिर्देशनपत्र पात्र तर तीन अपात्र
अमरावती,दि.06: अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 59 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यांची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 56 अर्ज पात्र तर तीन नामनिर्देशने अपात्र ठरविण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
छाननीअंती श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी ऊर्फ दीपक (भारतीय जनता पार्टी), श्री. नागोराव वामनराव हंबर्डे(बहुजन समाज पार्टी) व श्री. राजेश ब्रिजलाल चौधरी (बहुजन समाज पार्टी) यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर 56 अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत.सोमवार दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

