महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन.

0 झुंजार झेप न्युज
महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन.


पिंपरी चिंचवड,दि.14: पादचाऱ्यांसाठी, सायकलप्रेमी तसेच लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशाने आपण हरित सेतू हा उपक्रम राबवीत आहोत, तसेच घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवावा,तसेच महापालिकेच्या हरित सेतू उपक्रमात देखील आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी आज सकाळी ६ वाजता आकुर्डी परिसरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. 

आजच्या कार्यक्रमात सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, सुनील पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच इंडो अॅथलेस्टिक्स सोसायटी (आय.ए.एस.) चे गजानन खैरे आणि त्यांच्या संस्थेचे संपूर्ण सहकार्य या भव्य सायकल रॅलीला लाभले. त्यांच्या सहकार्याने सायकल फेरी सुरक्षितपणे यशस्वी झाली. आजच्या रॅलीत आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सुमारे ५५३ सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदवला. 

आजच्या सायकल रॅलीच्या सुरुवातीस सहभागी सायकलपटूंनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत “आम्ही शपथ घेतो की, आम्ही आपला तिरंगा ध्वज आमच्या घरांवर फडकवू तसेच स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करू आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी आम्ही स्वत:ला समर्पित करू” अशी शपथ घेतली. 

केंद्र शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या असून महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास तिरंगा स्वाक्षरी मोहीम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या सायकल रॅलीचा प्रारंभ या शहरातील जेष्ठ नागरिक रवींद्र होनराव यांनी झेंडा दाखवल्यानंतर सकाळी ६.०० वाजता आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृह येथून झाला. ही रॅली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोरून संजय काळे ग्रेड सेपरेटर - नॅशनल सुपर मार्केट – म्हाळसाकांत चौक – लोकमान्य हॉस्पिटल – फ क्षेत्रीय कार्यालय – काचगर चौक – भेळ चौक – छत्रपती संभाजी महाराज चौक –हुतात्मा चौक – अप्पूघर चौक – धर्मराज उड्डाणपूल – आकुर्डी रेल्वे स्टेशन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय या मार्गाने मार्गस्थ होऊन पुन्हा निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगुळकर सभागृह या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला.

घरोघरी तिरंगा मोहीमेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीवेळी माझी वसुंधरा ही पर्यावरण रक्षणाची सामुहिक शपथही घेण्यात आली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक यांनी केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.