क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन
पिंपरी, दि. १२ एप्रिल २०२६ : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांच्या अनुषंगाने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे दि. ११ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दुर्मिळ, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी छायाचित्रांचा मौल्यवान संग्रह दिलीप वानखेडे, स्मृती नागार्जुन संग्रहालय आणि अश्विनी डोके यांच्याकडून उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रदर्शनामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या आयुष्याचा संघर्षमय आणि परिवर्तनशील प्रवास प्रभावीपणे उलगडणारी छायाचित्रे सादर करण्यात आली आहेत. महात्मा फुले वाडा व त्यातील विविध वास्तूंचे दृश्य, जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या विवाह सोहळ्याचे क्षण, मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेतील अध्यापनाचे दृश्य, सावित्रीबाई फुले यांच्या वास्तव्याचे अवशेष, तसेच फुले दांपत्याच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे यामधून त्या काळातील सामाजिक वास्तव आणि त्यांच्या क्रांतिकारी कार्याची झलक अनुभवता येते. त्यांच्या विविध भाषांतील हस्ताक्षरांमधून त्यांच्या विद्वत्तेची आणि विचारांची व्यापकता अधोरेखित होते. अशा अनेक दुर्मिळ, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी छायाचित्रांचा समृद्ध संग्रह या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण टिपणारी छायाचित्रे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. विविध सामाजिक आणि राजकीय सत्याग्रह, कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या ऐतिहासिक भेटी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती करतानाचे दुर्मिळ क्षण, घटना समितीच्या कामकाजातील सहभाग, मंत्रिपदाची शपथ घेतानाचे प्रसंग तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे भावनिक क्षण अशा अनेक छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख होते.
हे प्रदर्शन केवळ ऐतिहासिक छायाचित्रांचा संग्रह नसून सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय यांच्या विचारांचा प्रभावी संदेश देणारा प्रेरणादायी प्रवास आहे. नव्या पिढीने या महान विभूतींच्या कार्याचा वारसा समजून घेण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
