भविष्यातही समाजप्रबोधनाचे हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार – शाहीर राजेंद्र कांबळे

0 झुंजार झेप न्युज

 शाहीर राजेंद्र कांबळे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान

सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहात प्रारंभ

पिंपरी, दि. १२ एप्रिल २०२६ : गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे काम ही केवळ कला नसून सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव मला सतत प्रेरणा देत आली आहे. माझ्यासारख्या विविध भागांत जाऊन लोकजागृती करणाऱ्या शाहिराचा सन्मान करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलाकारांना दिलेला मान अधोरेखित केला असल्याचे शाहीर राजेंद्र कांबळे म्हणाले. तसेच भविष्यातही समाजप्रबोधनाचे हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ या उपक्रमाचा आज उत्साहात प्रारंभ झाला. या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी प्रज्ञावंत शाहीर राजेंद्र कांबळे यांना मानपत्र देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. 

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शकुंतला धराडे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

शाहीर राजेंद्र कांबळे यांनी चार दशकांहून अधिक काळ शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणातून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी संदेश समाजमनात पोहोचत असून त्यांच्या पोवाड्यांनी समाजजागृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

प्रबोधन पर्वाच्या सकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण

प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी पार पडली. शारदा मुंडे यांच्या ‘मी जोतीबाची सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण साकारण्यात आले. त्यानंतर शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी जलशातून समाजप्रबोधन, समानता आणि परिवर्तनाचे संदेश ओजस्वी शब्दांत मांडण्यात आले.

तसेच साधना मेश्राम व मंजुषा शिंदे यांच्या गीत गायनाच्या मैफिलीने सामाजिक जाणीव आणि विचारप्रबोधनाला सुरेल स्पर्श दिला. थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकातून अंधश्रद्धा, सामाजिक अन्याय आणि शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. यानंतर काव्यभूमी संस्थेच्या ‘गाथा साऊ जोतीची..’ या कवितामय कार्यक्रमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव काव्यरूपाने सादर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.