लाच घेताना तलाठी महिलेसह कोतवाल जाळ्यात
पुणे, दि.10: जमिनीवर वारसा नोंद घेण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील तलाठी महिलेसह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मनीषा साहेबराव माने (वय ४५, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी निमगाव खंडोबा, ता. खेड) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय ५८) अशी त्या लाचखोर दोघांची नावे आहेत. याप्रकरणी, ३४ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार खेड राजगुरुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदारांच्या वडिलांचे २०२४ मध्ये निधन झाले आहे. त्या जमिनीवर वारसानोंद होण्यासाठी तक्रारदारांनी ६ मार्च रोजी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथील तलाठी मनीषा माने यांच्याकडे अर्ज केला होता. वारंवार चौकशी केल्यानंतर देखील माने यांनी तक्रारदार आणि त्यांच्या भाऊ-बहिणींची जमिनीला वारसा नोंद केली नाही. ३० मार्च रोजी तक्रारदार हे वारसा नोंदीबाबत चौकशी करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. त्या वेळी तलाठी मानेने कोतवाल चव्हाणला तक्रारदारांकडून वारसा नोंदीसाठी पैसे घेण्यास सांगितले. तक्रारदार कोतवालाला भेटले. त्याने तलाठी माने आणि स्वतःसाठी सहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली होती.. तक्रारीत दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी (दि.८) तलाठी कार्यालयातच सापळा रचून एसीबीच्या पथकाने तलाठी माने आणि कोतवाल चव्हाण या दोघांना साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली

