पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार

0 झुंजार झेप न्युज

 पवना धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरात २० जूनपासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार


पिंपरी-चिंचवड, दि.20 : पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने पवना धरणातून केला जातो. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून यंदा मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिनांक २० जून २०२६ पासून शहरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील नागरिकांना आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे तसेच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करणे आवश्यक आहे.


  • पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडून खालील नमूद केल्याप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत :

  • * स्विमिंग पूल भरण्यासाठी किंवा देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद राहील.
  • * गृहनिर्माण संस्था, सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांच्या संगोपनासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी पुनर्वापरित (STP) पाण्याचा वापर करावा.
  • * वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नये.
  • * पाणी कपातीच्या कालावधीत नवीन जलजोडण्या देण्यात येणार नाहीत.
  • * व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प तसेच इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी.
  • * घरगुती वापर, शाळा व रुग्णालये याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.


या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात येत असून पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पाणी ही मर्यादित आणि अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून प्रत्येक नागरिकाने तिचा जपून वापर करणे ही काळाची गरज आहे. पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करणे, नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय टाळणे, घरगुती पातळीवर पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे आणि पावसाचे पाणी साठविण्यास प्रोत्साहन देणे यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

कोट

"आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची पाणी सुरक्षितता निश्चित करेल." या भावनेतून सर्व नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करून पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा.

डॉ. विजय सूर्यवंशी,

आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.