बोगस वाहतूक पोलिसांच्या नावाने ई-चलान पाठवून फसवणुकीचा आरोप; कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड, दि.06; पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे तसेच नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे अशा वाहतूक नियमभंगाच्या नावाखाली बनावट ऑनलाइन पावत्या पाठवून फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित बनावट पावत्या व संदेशांची चौकशी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा रॅकेटवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
काळभोर यांनी यासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना माहिती देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, +91 90824 76202 या मोबाईल क्रमांकावरून वाहतूक पोलिसांच्या नावाने ऑनलाइन संदेश अथवा पावती पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय आहे. त्यामुळे या क्रमांकाची तांत्रिक तपासणी करून त्यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा, तसेच अशा प्रकारे आणखी नागरिकांची फसवणूक झाली आहे का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
दरम्यान, वाहतूक दंड किंवा ई-चलानासंदर्भात कोणताही संशयास्पद संदेश, लिंक किंवा पावती प्राप्त झाल्यास नागरिकांनी त्यावर तातडीने क्लिक न करता अधिकृत सरकारी वाहतूक पोर्टलवरून चलानाची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बनावट ई-चलानच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना अशा सायबर फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
— सचिन काळभोर,भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर

