थेट पद्धतीने वाहन भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रक्रियेवर सचिन काळभोर यांचा आक्षेप; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे चौकशीची मागणी

0 झुंजार झेप न्युज

गणेशमूर्ती संकलनासाठी २०० वाहनांच्या भाडेकरारावर निविदा काढा

पिंपरी-चिंचवड,दि.09 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशमूर्ती संकलन व वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या सुमारे २०० वाहनांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी खुली निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभागांमध्ये गणेशमूर्ती संकलन योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. या कामासाठी महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत ४०७/९०९ प्रकारची सुमारे २०० वाहने भाडेतत्त्वावर घेऊन गणेशमूर्ती संकलन व वाहतूक केली जात असल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे.

मात्र, संबंधित वाहनांची भाडेतत्त्वावर नियुक्ती करताना निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने ठेकेदारांकडून वाहने घेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून नियमानुसार निविदा काढण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गणेशमूर्ती संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची सजावट तसेच त्यावर करण्यात येणारा खर्च याबाबतही काळभोर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाकडून या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याने सार्वजनिक पैशांचा काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“वाहने भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रक्रियेत स्पर्धात्मक निविदा राबविल्यास महापालिकेला योग्य दर मिळण्यासोबतच प्रक्रियेत पारदर्शकता राहील. त्यामुळे थेट पद्धतीने वाहन भाडेतत्त्वावर घेण्याऐवजी नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवावी,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

तसेच, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही काळभोर यांनी केला असून, या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन उद्यान विभागामार्फत वाहन भाडेप्रक्रियेची तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.