जरांडे यांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यास सचिन काळभोर यांची जाहीर हरकत

0 झुंजार झेप न्युज

• नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करू नये; सेवा नियम व पात्रतेची पडताळणी करण्याची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड,दि.12: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. जरांडे यांना उपायुक्तपदी नियुक्ती अथवा पदोन्नती देण्यासंदर्भातील प्रस्ताव सक्षम समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रस्तावाला जाहीर हरकत नोंदवली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना उपायुक्तपदी पदोन्नती देऊ नये आणि प्रस्तावित नियुक्तीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व नियमांची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले आहे. उपायुक्तपद हे महानगरपालिकेतील महत्त्वाचे प्रशासकीय पद असल्याने या पदावरील नियुक्ती करताना संबंधित अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव, प्रचलित सेवा नियम आणि महानगरपालिकेने निश्चित केलेले निकष यांची काटेकोर तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नियुक्तीचे निकष स्पष्ट करण्याची मागणी

श्री. जरांडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती कोणत्या नियमांच्या आणि पात्रतेच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. संबंधित नियुक्तीचा प्रस्ताव सक्षम समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि नियुक्ती प्रक्रियेची नियमानुसार पडताळणी करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

नियमानुसार निर्णय घेण्याचे आवाहन

प्रस्तावित नियुक्तीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात यावी आणि निर्णयामागील प्रशासकीय कारणे स्पष्ट करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित नियुक्तीची प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार असल्याची खात्री होईपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये. तसेच, नियुक्तीची प्रक्रिया प्रचलित सेवा नियमांशी विसंगत असल्याचे आढळल्यास प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी भूमिका सचिन काळभोर यांनी मांडली आहे.

महानगरपालिकेतील पदोन्नती आणि नियुक्त्यांमध्ये नियमपालन, पारदर्शकता आणि पात्रतेला प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यामुळे श्री. जरांडे यांच्या उपायुक्तपदावरील प्रस्तावित नियुक्तीबाबत प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

- सचिन काळभोर

भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.