विधनपरिषदेच्या बीड येथील रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने दौंड यांचा मार्ग मोकळा झाला. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि शिवसेना पक्षाचे तानाजी सावंत हे कनिष्ठ सभागृहाचे सदस्य झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडत आहे. दरम्यान, संख्याबळाच्या कारणामुळे भाजपने आपले उमेदवार तेली यांचा निवडणूक अर्ज मागे घेतला. आता येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता असेल.
संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. परळी मतदारसंघात दौंड कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. 2014 मध्ये चारही पक्ष जेव्हा स्वबळावर लढले होते, तेव्हा संजय दौंड यांनी परळी मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीटासाठी फील्डिंग लावली होती.
संजय दौंड अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येत आहे.
धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने बीड विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती.

