हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विकल्यास एक वर्षाचा तुरुंगवास होणार

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली - सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्क अनिवार्य केले असून यासंबंधीचा आदेश केंद्र सरकार जारी करणार आहे. सोने व्यापाऱ्यांना यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली असल्यामुळे १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. त्याचबरोबर केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू व्यापाऱ्यांना विकता येणार आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
याबाबत केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दागिन्यांची २०२१ पासून हॉलमार्क शिवाय विक्री होऊ शकणार नाही. जुने दागिने विकण्यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
यावर प्रतिक्रिया देताना रामविलास पासवान यांनी हॉलमार्क बंधनकारक केल्यानंतर फसवणुकीला आळा घालण्यात मदत होईल, असे म्हटले आहे. ९ कॅरेटचा दागिना विकून २२ कॅरेटचे पैसे अनेक सोने व्यापारी वसूल करतात. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करण्याची परवानगी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जर कोणत्याही सोने विक्रेता किंवा हॉलमार्क केंद्राने फसवणूक केली तर त्यांना एक लाख किंवा एकूण दागिन्यांच्या पाच पट दंड ठोठावला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सरकार हॉलमार्किंगसाठी सर्व शहरांमध्ये हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्याची तयारी करत आहे. आतापर्यंत फक्त २३४ शहरांमध्ये ही केंद्रे आहेत. लोक एक ठराविक फी भरुन दागिन्यांची तपासणी करुन घेऊ शकतात, असे रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. ज्या लोकांकडे जुने दागिने आहे त्यांचं काय.त्यांनाही हॉलमार्किंग बंधनकारक असणार का ? असं विचारले असता रामविलास पासवान यांनी सांगितले की, फक्त सोने व्यापाऱ्यांसाठी हा नियम आहे. सामान्य नागरिक आपले दागिने हॉलमार्कच्या दागिन्यांसोबत बदलू शकतात. देशात जवळपास चार लाख सोने व्यापारी आहेत. आतापर्यंत २८ हजार ८४९ जणांनी नोंदणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.