शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धवजींनी राऊत यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर भिडेंच्या सांगली ‘बंद’ला राऊतांनी ट्वीट करून प्रत्युत्तरदिले आहे. ट्वीट मध्ये राऊत म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्यात आली तेव्हा बंदची हाक का दिली नाही, असा सवाल त्यांनी संभाजी भिडे यांना विचारला आहे.
तसेच पुढे राऊत म्हणतात, छान. आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली, याचा निषेध म्हणून सांगली बंदची हाक दिली असती तर महाराष्ट्राला आनंद झाला असता ठीक आहे. चालायचचं. आपल्या विषयी आदर आहे. राहील, असे राऊत ट्वीट च्या माध्यमातून म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या मुद्यावरुन संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर भूमिका मांडताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती.

