शरद पवार हे 'जाणता राजा'च, संजय राऊतांनी मिसळला आव्हाडांच्या सुरात सूर

0 झुंजार झेप न्युज

प्रतिनिधी :
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आहेत अन्य कुणीही जाणते राजे नाहीत, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार हे जाणते राजे असल्याचे विधान केले होते. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार हे जाणते राजे असल्याचे म्हटले आहे. पवार हे जाणते राजे आहेतच. त्यांना ही पदवी जनतेने दिली आहे, असे राऊत म्हणाले. आज पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी शरद पवार यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा गौरव केला. राऊत म्हणाले की, ''शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही.

दरम्यान, उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचाही राऊत यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की, ''उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपाचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र एखादा महापुरुष हा सर्वांचा असतो. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.''असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.