मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुरक्षा हटवल्यामुळे काहीही होणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केले तरी आदरणीय पवार साहेब हे घाबरणाऱ्यातला गडी नाही. पवार साहेब सह्याद्रीचा पहाड आहेत. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. लोकांचं प्रेम, आपुलकी हेच पवार साहेबांचे सुरक्षा कवच आह, अशी प्रतिक्रिय जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पवार साहेबांची सुरक्षा काढली हे एका अर्थाने बरं झालं. यानिमित्ताने केंद्र सरकार कोत्या मनाचे आहे, हे महाराष्ट्राला कळलं, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मा.शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्रचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम,आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांच सुरक्षाकवच आहे.सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं @BJP4India किती खोट्या मनोवृत्तीचे आहेत ते pic.twitter.com/A0B7pwJyPg- Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) January 24, 2020
दरम्यान, यापूर्वीदेखील काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली असून त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

