अशोक चव्हाणांचे बेरजेचे राजकारण, भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये
बहुजनांचे नेते नागनाथ घिसेवाड यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केल्यामुळे भोकरमध्ये पक्षाला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही.
नांदेड : भाजप नेते नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.
कोण आहेत नागनाथ घिसेवाड?
नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता.
1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत तर ते अवघ्या 500 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभेला ते दोन हजार मतांनी मागे पडले. दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. तेव्हापासून बहुजन नेते अशी त्यांची ओळख झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून ते आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
घिसेवाड यांच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला किती फायदा?
नागनाथ घिसेवाड यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घिसेवाड यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, ते कार्यकर्ते आता काँग्रेससाठी काम करणार आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष वाढीला मोठी मदत होणार आहे.
भोकर तालुक्यापुरता तरी मंत्री चव्हाण यांना कुठलाही ताण घ्यायची गरज पडणार नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच मंत्री चव्हाण यांनी विरोधकांना आपलेसे करुन घेऊन सुरु केलेल्या या बेरजेच्या राजकारणामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरलं आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घिसेवाड यांचे जल्लोषात स्वागत
नागनाथ घिसेवाड यांनी मुंबईत जाऊन मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आज नांदेडमध्ये परतले. नांदेडला आल्यावर काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घिसेवाड यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

