पोकळ भाईगिरी व भुरट्या चोऱ्या करणाऱ्याना पायबंद घाला….
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- चिंचवडगावातील केशवनगर भागात काही दिवसांपासून अनेक गैरप्रकार वाढले आहेत. या भागात काही ठिकाणी घरफोड्या होत असून (दि. ४) रोजी काकडे टाऊनशिपमध्ये रात्री २ ते ५ च्या दरम्यान तीन बंद फ्लॅट तोडून मोठी चोरी झाली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घरफोडीत जवळपास अडीच लाख रुपये व सोन्याचे चांदीचे दागिन्यांची चोरी झाली. या शिवाय परिसरात पेट्रोल चोरी, वाहनांची चोरी, घरफोडी, बाहेरील भागातील मुला-मुलींचा गैरप्रकार, दारू पिऊन चौकात, रस्त्यात दहशत निर्माण करणे, दुचाकी व कार जाणीवपूर्वक जोरात व लोकांना दहशत वाटेल अश्या चालविणे आदी प्रकार घडत आहेत.
परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व नागरिक यांची बैठक आयोजित केली होती. यास चिंचवड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, ए. पी. आय. ठुबल, पी.एस. आय. बामणे व परिसरातील नागरिक बैठकीत उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलून पोकळ भाईगिरी करणाऱ्यांना व भुरट्या चोऱ्या करणाऱ्याना पायबंद घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व मधुकर बच्चे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अत्यंत उपयुक्त व मौलिक मार्गदर्शन केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. अश्या घटना गंभीर असून कोणाचीही गय केली जाणार नाही. अश्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन नेहमी सक्षमपणे काम करेल, अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटे यांनी दिली.
