राज्यात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; तर मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची भीती

0 झुंजार झेप न्युज

 राज्यात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; तर मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची भीती

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.


मुंबई : ऐन थंडीच्या मोसमात पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

गेले दोन दिवस कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभावमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुण्यातही अनेक भागांत पुढिल दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ऐन थंडीच्या मोसमात पावसानं हजेरी लावल्यामुळे सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. नेटकरी थंडीच्या मोसमात पडणाऱ्या या पावसावर भन्नाट मीम्स शेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात हिवाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे झालेले वातावरणातील बदल मात्र चिंतेचा विषय ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.