पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं टाळकं सटकल्याने त्याने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक घटना
मुंबई: पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं टाळकं सटकल्याने त्याने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज होता. मात्र अधिक तपास केल्यानंतर ड्रायव्हरनेच हा पराक्रम केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
बोरिवलीत पाच लक्झरी बसेसला आग लागली होती. या आगीत या पाचही लक्झरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. सुरुवातीच्या चौकशीत ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलीस चौकशीतही ही आग शॉर्टसर्क्रिटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी अधिक खोलवर तपास केला. यावेळी एमएचबी पोलिसांनी बसच्या चालक अजय रामपाल सारस्वतला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यानेच बसेसला आग लावल्याची कबुली दिली. पगार न मिळाल्याने पाच बसेसला आग लावल्याची कबुली या ड्रायव्हरने दिली.
अजय सारस्वतने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या पाचही बसेसची किंमत सुमारे 3 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. या पाचही बसेसचा विमा उतरविण्यात आलेला नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येले यांनी सांगितलं.

