पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रचंड बहुमताने भाजपची एकहाती सत्ता; महापौरपदासाठी भोसरी-चिंचवडमध्ये चुरस
पिंपरी चिंचवड दिनांक 15 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने प्रचंड बहुमत मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महानगरपालिका हद्दीतील भाजपचे नगरसेवक मोठ्या फरकाने विजयी झाल्याने शहरात भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली असून हा निकाल पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी दिलासादायक ठरला आहे.या ऐतिहासिक विजयानंतर पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपचा महापौर होणार हे आता निश्चित मानले जात आहे. महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून पुढील आठ दिवसांत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या निर्णयाकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.
महापौरपदासाठी शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे तसेच पक्षातील वरिष्ठ नेते आणि मंत्री यांच्यात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे महापौरपद भोसरी विधानसभा मतदारसंघातून की चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जाणार, यावरून पक्षांतर्गत चुरस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दरम्यान, या विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद द्विगुणित झाला आहे. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत नागरिकांनी एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कौल दिल्याने पालकमंत्री अजितदादा पवार यांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे — महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार?
- सचिन काळभोर
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर

