पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील गैरप्रकारांची चौकशी करा – पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे बहुजन विकास आघाडीची मागणी

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील गैरप्रकारांची चौकशी करा – पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे बहुजन विकास आघाडीची मागणी



पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय कागदपत्रांबाबत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

       या संदर्भात पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र व इतर शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रियेमध्ये संशयास्पद प्रकार घडत असल्याने याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

निवेदनामध्ये अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून तसेच नागरी सुविधा केंद्रातील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.       

      तसेच शैलेश एकांबरी बासुतकर याच्याद्वारे बोगस कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       यासोबतच शैलेश एकांबरी बासुतकर याच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने त्याच्या पत्नीच्या नावावर असलेले महा ई-सेवा केंद्र व आधार मशीन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे वितरित झालेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून सत्य जनतेसमोर मांडण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच अपर तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या विविध प्रमाणपत्र मंजुरीच्या डेस्कचा एक्सेस तपासून त्या डेस्कवरून मंजूर झालेल्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

     संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा. अन्यथा या मागण्या मान्य न झाल्यास बहुजन विकास आघाडीच्या वतीने एक दिवसीय “पोल खोल आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

     यावेळी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल, ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब कांबळे, प्रदेशाध्यक्ष मनोज क्षिरसागर, प्रदेश उपाध्यक्ष कोमलताई शिंदे, प्रदेश नेते मिलिंद सोनवणे, महिला अध्यक्षा ज्योतीताई कांबळे, शहराध्यक्षा ज्योतीताई शिंदे, शहराध्यक्ष अक्षय म्हात्रे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, शहर उपाध्यक्ष कैलास कसबे, युवा नेते संदीप मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.