धायरीतील दलित कुटुंबाचा छळ; आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी महिलेचा बेमुदत उपोषणाचा इशारा
पुणे,दि.11: धायरी परिसरातील वेदांत हाईट्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या कुटुंबावर जातीय द्वेषातून अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप करत पीडित महिलेने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
धायरी येथील वेदांत हाईट्स, ए विंग, फ्लॅट क्र. २०४ येथे राहणाऱ्या अंबिका समाधान कारंडे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात हा आरोप केला आहे. त्या आपल्या पती समाधान सत्यवान कारंडे आणि तीन मुलांसह २०१९ पासून येथे वास्तव्यास आहेत. कुटुंबाने कष्ट करून हे घर विकत घेतले असून त्यांच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत.
अंबिका कारंडे यांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील काही व्यक्तींनी जातीय मानसिकतेतून त्यांच्या कुटुंबाला वारंवार त्रास दिला. तक्रारीनुसार गणेश संभाजी पाटील, दिलीप संभाजी पाटील, संजय बोरसे, यश संजय बोरसे, किर्ती संजय बोरसे, भाविका संजय बोरसे आणि सागर अनपट यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलींना त्रास दिल्याचा आरोप आहे. या व्यक्तींनी जबरदस्तीने स्पर्श करून मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी १५ मे २०२५ रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप कारंडे कुटुंबाने केला आहे.
पीडितांच्या म्हणण्यानुसार, आरोपींना समन्स देऊन सोडण्यात आल्याने त्यांना कायद्याची भीती राहिली नाही आणि त्यांनी पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना आणि न्यायालयालाही वेळोवेळी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व घटनांमुळे आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे सांगत अंबिका कारंडे यांनी प्रशासनाकडे आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्याय मिळावा यासाठी त्या बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

