झाडाचं पान का पडलं, या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, जयंत पाटलांचा टोला

0 झुंजार झेप न्युज

आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. झाडाचं पान का पडलं? या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, असा टोलाही जयंत पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरुन लगावला. (Jayant Patil Criticizes BJP)

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आले होते. यानंतर भाजपने आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. मात्र मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी सर्व आरोप मागे घेतले. यावरुनच जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला.

त्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील, त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. त्यात पोलिसांनी काही निष्कर्ष काढला असेल आणि त्या महिलेने तक्रार मागे घेतली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. झाडावरील पानही पडले तरी ते पान का पडले यासाठी भाजपा आंदोलन करु शकते. पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

दरम्यान “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेऊ, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

“प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. भाजपला पराभूत करणं हे आमचं ध्येय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.