धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केल्यानंतर ती पुन्हा परत घेतलेल्या रेणू शर्मा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन चित्रा वाघ यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड यांनीही अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसला पाहिजे. त्यासाठी रेणू शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हटलं आहे.
हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी नांगरे-पाटील यांची भेट घेऊन केली आहे. नंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे म्हणत रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
हे सगळं धक्कादायक, तातडीने कारवाई करा
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच रेणू शर्मा यांनी आपली तक्रार अचानकपणे मागे घेत हा आमचा कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शर्मा यांच्या तक्रार मागे घेण्यामुळे भाजप नेत्या यांनी रेणू शर्मा यांना धारेवर धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता. रेणू शर्माच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. शरद पवार यांनीही या प्रकरणाची दखल घेत, पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं म्हटलं होतं. भाजपनंही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीपासून ते आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं.
दरम्यान, भाजपच्याच कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी रेणू शर्माविरोधात पोलिसांना एक पत्र लिहिलं आणि या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. चार दिवस हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. मात्र, अचानकपणे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली. त्यामुळे आता रेणू शर्मा यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

