कोरोना प्रतिबंधक नियम न पाळता डोंबिवली येथे 27 मार्च रोजी आंदोलन केल्यामुळे तब्बल 125 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.
ठाणे : कोरोना प्रतिबंधक नियम न पाळता डोंबिवली येथे 27 मार्च रोजी आंदोलन केल्यामुळे तब्बल 125 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, रविवार बंदचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी हे व्यापारी आंदोलन करत होते. प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरुन डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेश मागे घेण्यासाठी आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिलेयत. मात्र व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता दिलेले आदेश मागे घ्या अशी मागणी केली. तसेच 27 मार्चला तारखेला डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काही व्यापाऱ्यांनी तोंडावर मास्क परिधान केले नव्हते. तर सामाजिक अंतराचे पालन केले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरून 125 आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवार, रविवारी बंद
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक जिल्ह्यांत वेगवेगळे नर्बंध लागू केले जात आहेत. हीच परिस्थिती कल्याण आणि डोंबिवली येथे आहे. येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे येथे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे मनपा हद्दीत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता येथे सर्व दुकनं आणि आस्थापना बंद असणार आहेत.
नवे नियम काय आहेत?
मनपा आयुक्तांनी घेतलेल्या आदेशानुसार शनिवार आणि रविवारी बंद पाळण्याचे आदेश आहेत. यावेळी शहरातील फेरीवाल्यांनाही पूर्णपणे मज्जाव करण्यात आहे. या काळात शनिवार आणि रविवारी भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तसेच रेस्टारंट, हॉटेल, बारला पार्सल सेवा देता येईल. डी मार्ट आणि मॉल्सदेखील 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील.
ठाण्यात कोरोनाची स्थिती काय?
दरम्यान, ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. येथे सध्या 35264 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 5954 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यात आतापर्यंत 291380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 332629 वर पोहोचला आहे. त्यात येथे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केलेले असूनसुद्धा कोरोनाची साखळी तोडण्यात म्हणावे तसे यश येत नाहीये. परिणामी येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढलीये.

