देशात कोरोनाची दुसरी लाट? गेल्या 24 तासात 68 हजाराहून जास्त रुग्णांची भर

0 झुंजार झेप न्युज

गेल्या 24 तासात देशात 68 हजाराहून जास्त कोरोना रुग्णांची भर पडली असून 291 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 62 हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. रविवारी एकाच दिवसात 68 ,020 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 291 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

रविवारी 32,231 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शनिवारी देशात 62,716 नव्या रुग्णांची भर पडली होती. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. 

देशात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही एक कोटी 20 लाख 39 हजार 644 इतकी झाली आहे तर आतापर्यंत एक कोटी 13 लाख 55 हजार 993 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण पाच लाख 21 हजार 808 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एक लाख 61 हजार 843 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत सहा कोटीच्या वर लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

आज नवीन 17 हजार 874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 325901 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. आज दिवसभरात कोरोनाने 108 रुग्णांचा बळी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.