आरोपी आणि पोलिस कॉन्स्टेबलची हातमिळवणी असल्यामुळेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा पीडित तरुणाने केला आहे.
औरंगाबाद : पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाला पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलिस स्थानकात गेला असताना पोलीस कॉन्स्टेबलनेच त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे. सुनील मगर असं जखमी पीडित तरुणाचं नाव आहे. सुनील मगर डोकं फुटलेल्या अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
नेमकं काय घडलं?
जखमी तरुण सुनील मगर आणि सोनू घुरी या आरोपीमध्ये वाद झाला होता. मारामारीत सुनील मगरचं डोकं फुटलं. त्यानंतर सुनील तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी सुनीलचं काहीही ऐकून घेण्यास नकार दिला.
तरुणाच्या कुटुंबीयांनाही मारहाण
आरोपी आणि पोलिस कॉन्स्टेबलची हातमिळवणी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा पीडित तरुणाने केला आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबालाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसाने सुनीलला केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्यावर कारवाई होणार का, हा सवाल विचारला जात आहे.
जेवण न दिल्यामुळे तरुणांची हॉटेलमध्ये तोडफोड
दुसरीकडे, जेवण दिलं नाही म्हणून तरुणांनी हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना औरंगाबादमध्येच उघडकीस आली आहे. औरंगाबाद शहरातील बीड बायपासवर मैथिली हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हॉटेलमधील टेबल खुर्च्यांसह कम्प्युटरचीही तरुणांनी तोडफोड केली. मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा हॉटेल व्यवस्थापनाचा दावा आहे. बाळापूर गावातील तरुणांनी तोडफोड केल्याची तक्रार हॉटेल चालकांनी केली आहे.

