शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?

0 झुंजार झेप न्युज

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. 

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. या लेटरबॉम्बची दखल घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तातडीने दिल्लीला बोलावलं आहे. पवार हे राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख जाणार की नाही? याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का? याकडे राज्याचे लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे आता परमबीर सिंग हे या सगळ्या प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट करतात का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं असेल. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली असून परमबीर सिंग हे मात्र मुंबईतल्या मलबार हिल परिसरातील त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळतेय.

अजितदादा, पाटील जाणार

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपातील सत्यतेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. या पत्रात सिंग यांनी शरद पवारांनीही गृहमंत्र्यांविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देशमुखांशी फोनवर चर्चा

दरम्यान, लेटर बॉम्बनंतर पवारांनी देशमुखांशी फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटलांशीही पवारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

गृहमंत्री कायम राहतील

दरम्यान, जयंत पाटील यांनी पवारांनी बोलावलेली बैठक नियोजित असल्याचा दावा केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत असून ते कायम राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधकांची सरकार बरखास्त करण्याची मागणी हस्यास्पद असल्याचंही ते म्हणाले.

राऊत पवारांना भेटणार

शिवसेनेचे नेते संजय राऊतही आज शरद पवारांची दिल्लीत भेट घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते पवारांची भेट घेणार आहेत. राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.