एका तरुणाने तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बदलापूर : एका तरुणाने तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरातील एका ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेच्या रितू वर्ल्ड सोसायटी आहे. या सोसायटीत संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. या सोसायटीत सत्यप्रीत चॅटर्जी हा तरुण C विंगमध्ये सातव्या मजल्यावर भाड्याने राहत होता. चॅटर्जी हा प्राणीमित्र होता. त्यामुळे त्याने घरात एक मोठा कुत्रा आणि कुत्र्याची दोन लहान पिल्लं पाळली होती.
शुक्रवारी संध्याकाळी अचानक त्याच्या घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे त्याच्या सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने त्याच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी सत्यप्रीत चॅटर्जी याच्यासह तीन कुत्रे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे चॅटर्जी याने स्वत:ला बेडरुममध्ये पेटवून घेतलं. तसेच पेटवून घेण्यापूर्वी त्याने दरवाजा उघडला जाऊ नये, यासाठी बेडरूमच्या दरवाजाला कपाट टेकवून ठेवलं होतं.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती
या प्रकारानंतर बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तपासादरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. ज्यात बायको आणि मुलं सोडून गेल्यानं नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
मात्र चॅटर्जीने स्वतः आत्महत्या करताना निष्पाप मुक्या जनावरांचा जीव का घेतला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.

