सचिन वाझेंचा मुक्काम ‘वर्षा’वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

0 झुंजार झेप न्युज

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. 

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण या प्रकरणात झालेल्या आरोपाने महाराष्ट्राची बदनामी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा ठकारे सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही, असं अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.

वाझे वर्षावर राहत होते

सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. वाझे काय करत होते. त्यांचे काय उद्योग होते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला

राज्यात पैसे द्या आणि मुडदे पाडा असा कारभार सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं सांगतनाच वाझेंची चौकशी होत आहे. आता गृहमंत्र्यांचीही होईल. राज्याला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे. असा बेजबाबदार मुख्यमंत्री पूर्वी झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकक्षणही खुर्चीवर राहू नये, असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना आधी कळवलं होतं. मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.