सोलापुरात सोन्याच्या दागिन्यांसाठी घरमालकिणीचा भाडेकरूंनी गळा चिरून खून केल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. घरकाम करणाऱ्या महिलांकडून चोरीचे प्रकार समोर आलेले आहेत. पण सोलापुरात सोन्याच्या दागिन्यांसाठी घरमालकिणीचा भाडेकरूंनी गळा चिरून खून केल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
महिलेचा गळा दाबून खून करून सोन्याचे दागिने चोरी
शहरातील नई जिंदगी परिसरातील अंबिकानगर येथील रूपा भास्कर शिंदे (50) या महिलेचा गळा दाबून खून करून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.
तीन आरोपींना पोलिसांकडून अटक
रूपा भास्कर शिंदे यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी अमीन अली रियाज अहमद चौकी आणि मुजम्मिल अहमद रियाज चौकी आणि संजय गुजले या तीन आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केली. यापैकी दोन आरोपी हे मृत रूपा शिंदे यांच्याकडे भाड्याने राहण्यास होत्या. तिसरा आरोपी त्यांचा मित्र असून, या तिघांनी हा गुन्हा केल्याचं समोर आलंय.
तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हा गुन्हा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड केलाय.
दिलेले उसने पैसे मागितल्यामुळे मित्राकडून घात
पैसे उसने देणे किंवा घेणे हा आपल्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहार आहे. याच उसन्या पैशांवरुन सख्खे मित्र किंवा नातेवाईक कट्टर शत्रू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यात तर उसन्या पैशावरुन हत्याकांड झालं आहे. उसने दिलेले पैसे मागितल्याने मित्राच्या सहाय्याने गळा आवळून हत्या झाल्याची घटना भंडाऱ्यात झाली. इतंकच नाही तर पुरावे मिळू नयेत म्हणून मृतदेह कालव्यात फेकला. मात्र कायद्याचे हात कुठपर्यंत पोहोचू शकतात, हे भंडारा पोलिसांनी अवघ्या 3 तासात दोघांना बेड्या ठोकून दाखवून दिलं.

