बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने (BJP) बहिष्कार टाकला आहे.
बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली. उद्या म्हणजेच 20 मार्च रोजी ही निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक नव्याने घेण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला.
पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.
धनंजय मुंडेंची जय्यत तयारी
दरम्यान, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. 20 मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची काल बैठक घेतली. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.

