“हे माझं चुकलं का?” पिंपरीतील भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची स्वपक्षावर उघड नाराजी

0 झुंजार झेप न्युज

रवी लांडगे यांनी पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी स्वपक्षाला कोंडीत पकडणारी पोस्टरबाजी केल्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का?” असा सवाल रवी लांडगेंनी विचारला आहे. 

भोसरी मतदारसंघात पोस्टरबाजी

रवी लांडगे यांनी पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का? असा थेट प्रश्न रवी लांडगेंनी विचारला आहे. त्यांच्या पोस्टरवर #WeSupportRaviLandge असा हॅशटॅग देऊन पाठिराख्यांना समर्थन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावलले

भाजप नगरसेवक रवी लांडगे यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावलले होते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेवक रवी लांडगे यांनी फलक लावले आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे एकमेव बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक होते.

कोण आहेत रवी लांडगे?

रवी लांडगे हे पुण्यातील भाजपचे दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. इतिहासात पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली तेव्हा लांडगे कुटुंबातील सदस्याला पालिकेतील एक प्रमुख पद मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी शब्द दिल्याचा दावाही नगरसेवक रवी लांडगे यांनी केला होता.

“हे माझं चुकलं का?”

यंदा शेवटची संधी होती, मात्र स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही त्यांना डावलण्यात आलं. अखेर त्यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी आपली उघड नाराजीही व्यक्त केली होती. “चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय, हेच आमच्या कुटुंबाचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध केला, हे माझं चुकलं का?” असे अनेक प्रश्न शहरभर लावलेल्या पोस्टरमधून विचारले जात आहेत.

रवी लांडगे यांच्यासह इतरही भाजप नगरसेवक स्वपक्षाला कोंडीत धरत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मात्र लांडगेंच्या या फलकांची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवी लांडगेंची पोस्टरबाजी आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.