तब्येत पवारांची बिघडली, सरकारचं मला माहीत नाही; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

0 झुंजार झेप न्युज

सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावं लागतं. असं सांगावं लागतं तेव्हा काही तरी गडबड आहे.

पुणे: सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावं लागतं. असं सांगावं लागतं तेव्हा काही तरी गडबड आहे. हे समजून जायचं असतं. आजारी नसलेल्या माणसाला तो आजारी नाही हे सांगावं लागत नाही. तो ठणठणीत असल्याचं दिसून येतं असं सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. परंतु सरकारचं मला माहीत नाही, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाच वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, सरकार टिकेल हे का सांगावं लागतं? सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेली तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं, असं सांगतानाच पवारांची तब्येत बिघडली आहे. सरकारचं मला माहीत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

ठरेल तेव्हा कळेल

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल यावेळी त्यांना करण्यात आलं. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अंदाज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. तुमच्याकडूनही हेच अंदाज समजत आहेत. परंतु जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा पहाटेच्या शपथविधीसारखं नंतर कळेल, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा धुरळा उडवून दिला.

पवार-शहांची निवांत भेट का झाली माहीत नाही

शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे. विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असंही ते म्हणाले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

लॉकडाऊनला कडाडून विरोध करणार

राज्याला आता लॉकडाऊन परवडणार नाही. तुम्ही निर्बंध कडक करा, हरकत नाही. पण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही आणि आम्ही त्याला कडाडून विरोध करू, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीत बसण्यापेक्षा कपडे बदलून झोपडपट्ट्यांमध्ये जावं, तिथल्या लोकांची परिस्थिती पाहावी, असं सांगतानाच प्रत्येक झोपडीत काही ना काही उद्योग चालत असतो. तो बंद झाला तर त्यांच्या उपासमार येईल. राज्यात एक कोटी असंघटीत कामगार आहे. मागच्यावेळी त्यांना काहीच पॅकेज दिलं नाही. यावेळीही त्यांना पॅकेज देणार नाही आणि घरी बसा म्हणून सांगणार हे चालणार नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केली. दिवसाचे व्यवहार सुरू ठेवावेत. रात्री संचारबंदी लागू करावी. आमचा त्याला विरोध नाही. नाईट लाईफची तशीही आम्हाला गरज नाही. ज्यांना गरज आहे. ते तुमच्यासोबत आहेत, असा चिमटाही त्यांनी लगावला.

पवारांना आराम मिळो

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचं मलाही नवाब मलिक यांचं ट्विट वाचून कळलं. पवारांना आराम मिळू दे अशी मी महाराष्ट्राच्या कुलभवानीला प्रार्थना करतो, असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.