महासभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्याची मागणी केल्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या एकूण 15 नगरसेवकांचे एका महिन्यासाठी निलंबन करण्यात आले.
नवी मुंबई : महासभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्याची मागणी केल्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या एकूण 15 नगरसेवकांचे एका महिन्यासाठी निलंबन करण्यात आले. महासभा ऑनलाईन सुरु असताना या नगरसेवकांनी मनपाच्या सभागृहात उपस्थिती लावली होती. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन तसेच सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवून या नगरसेवकांचे निलबंन करण्यात आले. यामध्ये 14 नगरेसवक हे महाविकास आघाडीचे आणि 1 नगरसेवेक भाजपचा आहे. आगामी एका महिन्यासाठी हे निलंबन असेल.
महासभा ऑफलाईन घेण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार पनवेल मनपाची महासभा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. यावेळी वाढीव प्रॉपर्टी टॅक्सबाबत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. तसेच महासभा ऑनलाईन पद्धतीने न घेता, ती ऑफलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणीसुद्धा केली. तसेच, या सर्व नगरसेवकांनी पनवेल मपनाच्या सभागृहात येऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले. याच कारणामुळे या सर्व 15 नगरसेवाकांचे निलंबन करण्यात आले.
पोलिसांना पाचारण
पनवेल माहापालिकेने एकूण 15 नगरसेवकांचे एका महिन्यासाठी निलंबन केल्यानंतर या सर्व नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांनी सभागृहाच्या बाहेर न जाता वाढीव प्रॉपर्टी टॅक्सबाबत विरोध केला. या कारणामुळे निलंबित नगरेसवक सभागृहाबाहेर जात नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश
दरम्यान, पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यात खारघर नोडमध्ये कोरानाची रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्यात आले आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत होते. तसेच सेंट्रल पार्क येथे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

