परभणीत कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. परभणीत दर दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढील आहे.
परभणी: परभणीत कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. परभणीत दर दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढील आहे. त्यामुळे प्रशासनाने इयत्ता 10 आणि 12 वी वगळता सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील धार्मिकस्थळंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेघाने वाढत आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. दर दिवशी परभणीत 300 ते 400 रुग्ण आढळत आहते. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता सर्व शाळा येत्या 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिकस्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता सर्व धार्मिक स्थळे, मंदिरेही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना प्रवेश मनाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विदर्भातील 11 जिल्ह्यातील नागरिकांना परभणीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच परभणीतून विदर्भात जाण्यासही नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत हा प्रतिबंध राहणार आहे.
कार्यालयीन वेळांना चाप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी 7 वाजल्या पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात दुपारी 2 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
11 जण दगावल्याने खळबळ
परभणी जिल्ह्यात सध्या 2535 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 11 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागी झाले आहे. जिल्ह्यात अति गंभीर रुग्णांनासाठी 6 DCHC कोरोना रुग्णालयात 955 खाटा असून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी DCH रुग्णालयात 662 खाटा आहेत. अत्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी 142 कोरोना केअर सेंटर असून जिल्ह्यात एकूण 9354 खाटा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आज घडीला एकही हॉटस्पॉट नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

