नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
नाशिक: नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कारवाई केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कोरोना उपाययोजनांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.नाशकात रुग्णसंख्या वाढत असतांनाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपाययोजनांबाबत केलेली दिरंगाई आणि गलथान कारभाराप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील 7 व्हेंटिलेटर वापरात
एकीकडे रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नसतांना जिल्हा रुग्णालयातील 80 पैकी केवळ 7 व्हेंटिलेटर वापरात असल्याची बाब समोर आली. व्हेंटिलेटर वापराबाबत धक्कादायक बाब समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. आढावा बैठकीत धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे संताप व्यक्त केला. त्यानंतर तासाभरातचं जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिकमधील कोरोना स्थिती
नाशिकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नाशिकमध्ये गुरुवारी दिवसभरात 3 हजार 784 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत 2 हजार 262, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 335, मालेगाव महापालिका हद्दीत 136 तर जिल्हा बाहेरिल 51 रुग्णांचा समावेश आहे.
बेडसाठी आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा मृत्यू
नाशिक महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी कोरोनाबाधितानं आंदोलन केलं होते. बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णानं ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या मांडला होता. संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात खळबळ माजली होती. आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं त्या रुग्णाला बिटको रुग्णालयात रुग्णालायात दाखल केलं होतं. महापालिका प्रशासनानं ऑक्सिजन बेडसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केलं होतं. मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.

