राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील तू तू मै मै अजूनही संपलेली नाही.
कोल्हापूर: राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील तू तू मै मै अजूनही संपलेली नाही. या दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही टीका केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विकृत टीका करणाऱ्या जिंदालबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी, एवढीच मी मागणी केली होती. यात चंद्रकांतदादांना चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती, अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे.
चंद्रकांतदादा फडणवीसांच्या मतदारसंघातूनही लढतील
चंद्रकांतदादांकडे दोन नंबरचं पद आहे. तरीही त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात एक मतदार तयार करता आला नाही. मी पाचवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकून आलो आहे. पुढच्यावेळी कदाचित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यसभेत जातील. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील नागपूरमधूनही विधानसभा निवडणूक लढवतील, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. चंद्रकांतदादांना तयार मतदारसंघात जाण्याची सवयच आहे. त्यांच्या या अफाट लोकप्रियेबाबत मला काहीच बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करायच्या नाही का?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर कोणी टीका करत असेल तर त्याविरोधात बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. नेत्याचा अपमान झाल्यावर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करायची नाही का?, असा सवालही त्यांनी केला. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार करावे लागतात. रक्त सांडावं लागतं. तेव्हा कुठे मतदारसंघ मजबूत होतो. याचा दादांना अनुभवच नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
चंद्रकांतदादांचं आव्हान
दरम्यान, काल चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलंय. दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागल मतदारसंघात मतांचं विभाजन करुन ते निवडून येतात. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना दिलं आहे.
काल मुश्रीफ काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपच्या आयटीसेलच्या प्रमुखाने आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी माफी मागा नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यावर मीडियाशी संवाद साधताना मुश्रीफ यांनी हे विधान केलं. मी फक्त मीडियासेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याप्रकरणी भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. पण चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून? त्यांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं आहे, अशी घणाघाती टीकाही मुश्रीफ यांनी केली.

