वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून अजून एक आत्महत्या?, यवतमाळ जिल्हा परिषदेवर ‘आयटक’चा धडक मोर्चा

0 झुंजार झेप न्युज

अंगणवाडी सेविका माया गजभिये यांनी पर्यवेक्षिकेच्या त्रासाला कंटाळून 1 एप्रिलला आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय.

यवतमाळ : जिल्ह्यातील पिंपळगाव इथं अंगणवाडी सेविका माया गजभिये यांनी पर्यवेक्षिकेच्या त्रासाला कंटाळून 1 एप्रिलला आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय. अशावेळी मृत अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ने जिल्हा परिषदेवर धडक देत पर्यवेक्षिका शोभा पटले यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. 

पिंपळगाव येथील अंगणवाडी सेविका माया गजभिये यांनी पर्यवेक्षिका शोभा पटले यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. माया गजभिये यांच्या आत्महत्येसाठी पर्यवेक्षिका कारणीभूत असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला. पर्यवेक्षिका पटले या पोषण आहार ॲपमध्ये इंग्रजीत माहिती भरण्यासाठी आणि इतर कारणाने मानसिक त्रास देत होत्या, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला.

ही पर्यवेक्षिका वादग्रस्त असून त्यांची अनेकदा बदलीही करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आर्थिक मदतीची मागणी

मृत माया गजभिये अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, कुटुंबातील महिलेला अंगणवाडीत समावून घेण्यात यावे आदी मागण्या आयटक आणि राहुल गांधी विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मागणीचं निवेदन देण्यात आलंय.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : आरोपींना फाशी देण्याची मागणी

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी दीपालीच्या आईने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विनोद शिवकुमार याने दीपालीला गर्भवती असताना जंगलात फिरायला लावले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतरही दीपालीला रजा न देता दुसऱ्या दिवशी कामावर हजर राहायला सांगण्यात आले. गर्भपात झाल्यावर महिलांना रजा द्यावी, असा शासकीय नियम आहे. मात्र, दीपालीला त्रास देण्याच्या उद्देशाने विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांनी तिला कामावर हजर राहायला लावले. त्यामुळे या दोघांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा मलाही फाशी द्या, असे दीपालीच्या आईने म्हटले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.