•जिल्ह्यात 50 टक्केपेक्षा कमी कोविड लसीकरण असणारी गावे निश्चित करा
सांगली,दि.28: कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शासनाकडून 15 ते 18 वयोगटातील युवक, युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जिल्ह्यात अंदाजे 1 लाख 37 हजार इतक्या युवक युवतींची संख्या असून यांच्या लसीकरणाचे नियोजन करावे. प्रामुख्याने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांची निश्चिती करून या ठिकाणी लसीकरण कक्ष सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी. त्याचबरोबर जिल्ह्यात आत्तापर्यंत 65.38 टक्के लोकांचा दुसरा डोस झाला आहे. तर 79.9 टक्के लोकांचा पहिला डोस झालेला आहे. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये लसीकरणाची टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी दिसून येत आहे, अशी गावे, शहरातील भाग निश्चित करून या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचे लसीकरण कॅम्प लावून प्राधान्याने लसीकरण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. आता ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेच पर्याय आहे. जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील अंदाजित 1 लाख 37 हजार इतक्या युवक युवतींची संख्या असल्याने यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे. हे लसीकरण प्रामुख्याने ते शिक्षण घेत असलेल्या शाळा, महाविद्यालयात करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. संभाव्य तिसरी लाट आलीच तर शाळा व कॉलेज बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या लसीकरणास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी 21 लाख 80 हजार 800 पात्र नागरिकांपैकी 19 लाख 42 हजार 918 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 14 लाख 25 हजार 916 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तरी ज्यांनी अद्यापही पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, 50 टक्के पेक्षा जास्त लसीकरण कमी असलेल्या गावांवर अधिकचे लक्ष केंद्र करण्यात आले असून अशा गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. लसीकरण कमी असलेल्या गावांमध्ये जानेवारी 2022 मध्ये विशेष लसीकरण अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्य करत आहे. त्याचबरोबर हर घर दस्तक या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात जावून लसीकरण करण्यात येत आहे. तरी नागरिकानीही लसीकरणास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा सविस्तर आढावा यावेळी सादर केला. ते म्हणाले जत तालुक्यात 2 लाख 51 हजार 182 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 93 हजार 169 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 2 हजार 507 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. खानापूर तालुक्यात 1 लाख 30 हजार 221 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 10 हजार 825 जणांनी पहिला डोस तर 76 हजार 178 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. मिरज तालुक्यात 2 लाख 69 हजार 133 पात्र नागरिकांपैकी 2 लाख 34 हजार 643 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 61 हजार 485 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. वाळवा तालुक्यात 3 लाख 48 हजार 861 पात्र नागरिकांपैकी 3 लाख 17 हजार 932 जणांनी पहिला डोस तर 2 लाख 68 हजार 421 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तासगाव तालुक्यात 1 लाख 92 हजार 332 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 76 हजार 588 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 34 हजार 167 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पलूस तालुक्यात 1 लाख 26 हजार 162 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 18 हजार 443 जणांनी पहिला डोस तर 90 हजार 167 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कडेगाव तालुक्यात 1 लाख 9 हजार 416 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 2 हजार 919 जणांनी पहिला डोस तर 79 हजार 951 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शिराळा तालुक्यात 1 लाख 24 हजार 634 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 19 हजार 224 जणांनी पहिला डोस तर 96 हजार 654 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात 1 लाख 16 हजार 537 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 12 हजार 113 जणांनी पहिला डोस तर 83 हजार 849 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आटपाडी तालुक्यात 1 लाख 5 हजार 924 पात्र नागरिकांपैकी 1 लाख 2 हजार 241 जणांनी पहिला डोस तर 68 हजार 588 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 4 लाख 6 हजार 400 पात्र नागरिकांपैकी 3 लाख 54 हजार 821 जणांनी पहिला डोस तर 2 लाख 63 हजार 949 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 21 लाख 80 हजार 800 पात्र नागरिकांपैकी 19 लाख 42 हजार 918 जणांनी पहिला डोस तर 14 लाख 25 हजार 916 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
