ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रासाठी विशेष नोंदणी मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0 झुंजार झेप न्युज

ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रासाठी विशेष नोंदणी मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली,दि.3: जिल्ह्यातील युडीआयडी संगणकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करून दिव्यांग व्यक्तींना विहीत मुदतीत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व सूक्ष्म नियोजन करून शासन निर्देशाप्रमाणे विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. 

 दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रासाठी ‍विशेष मोहिम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, सर्व गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.

 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच सर्व २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार वैद्यकिय सहाय्यभूत सेवा मिळणे व पुनर्वसनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र व ओळखपत्र निर्गमित करण्याशी संबंधित असलेल्या सर्व आरोग्य यंत्रणा, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग यांनी समन्वयाने शासनाने निर्देशित केलेल्या कालावधीमध्ये विशेष मोहिम आयोजित कराव्यात व दिव्यांगांना सुलभतेने दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी ते म्हणाले, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे इत्यादी ‍विविध विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरितांच्या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाने प्राधान्य दिले आहे. दिव्यांग व्यक्ती अस्मिती अभियानांतर्गत संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कार्यक्रम आराखडा निश्चीत करण्यात आला आहे. यामध्ये पात्र संभाव्य लाभार्थींची विशेष मोहिमांमध्ये नोंदणी २० ते ३१ ‍डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. युआयडी च्या वेबपोर्टलवर दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती कागदपत्रासह अपलोड करून ऑनलाईन नोंद करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या युआयडी प्रकल्पाच्या वेबपोर्टलव्दारे दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी सर्व तालुका स्तरावर ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र तर महानगरपालिका बाबतीत रूग्णालय स्तरावर ३ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.