जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उद्या जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन-शिवाजी इंदलकर
नाशिक,दि.10: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज शनिवार 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असल्याने या लोकअदालतीचा उपयोग संबंधित नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिटलेल्या प्रकरणांना अपिल नसल्याने वादाला पुर्णविराम मिळत असल्याने वेळ व पैशांचीही बचत होते. याबरोबरच तडजोडीने वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होवून, प्रलंबित प्रकरणांचा त्वरीत निपटारा होतो. तसेच लोकअदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळत असल्याने दोन्ही पक्षांचा फायदा होत असतो, असेही शासकीय प्रसिद्धीपत्रकामार्फत कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या लोकअदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, भुसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138, बँक, वित्तीय संस्था आदींच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. या अंतर्गत नाशिक न्यायालयात प्रलंबित असलेली एकुण 4 हजार 500 प्रकरणे व जिल्ह्यातील 15 हजार 600 प्रकरणांचा समावेश असणार आहे. याबरोबरच बँक, वित्तीय संस्था, शासकीय आस्थापनांच्या थकीत रक्कम वसुलीची नाशिक न्यायालयात 1 लाख 25 हजार दाखलपुर्व प्रकरणे व जिल्ह्यात 1 लाख 90 हजार प्रकरणांचाही समावेश असणार असल्याचे शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
यानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीत संबंधित नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
