भारत-पाक युध्दातील शहिदांच्या कुटुंबियांचा विजय दिवसाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी सन्मान
सांगली,दि.16: भारत-पाक 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान विजय दिवसाच्या सुवर्ण महोत्सवाच्या आयोजन प्रसंगी करण्यात आला. हा कार्यक्रम सैनिक संकुल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्यातील शुरवीर शहीद पांडुरंग साळुंखे - महावीर चक्र, शहिद शिपाई काशीनाथ कांबळे - वीर चक्र, शहीद नायक मारूती नाकील - वीर चक्र, हवलदार कृष्णा गुरव - वीर चक्र, हवलदार मेजर बाबू माळी - वीर चक्र यांच्या शौर्याचे स्मरण करून कर्नल विलास हरूगुडे (निवृत्त), ले. कमांडर एम. पी. शिंदे (निवृत्त), ले. कर्नल जी. ए. काणे (निवृत्त), कर्नल रवी देवभानकर (निवृत्त), कॅप्टन व्ही. एस. पोळ (निवृत्त) यांच्याहस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील 48 सैनिकांनी 1971 च्या युध्दात प्राणाची आहुती दिली. जिल्ह्यातील 15 सैनिकांना या युध्दात महावीर चक्र, वीर चक्र, सेना मेडल व मेन्शन इन डिस्पॅच अशा शौर्य पदकांनी सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी सूत्रसंचालन केले.
