•आजंती येथील ग्रामपंचायत भवनचे लोकार्पण
वर्धा,दि.11: हिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील ग्रामपंचायत भवनसह आजंती व शेगाव (कुंड) येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन, उद्गाटन तथा लोकार्पण पालकमंत्री सुनिल केदार यांच्याहस्ते आज झाले.
कार्यक्रमांना आमदार रणजित कांबळे, आ.समिर कुणावार, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील राऊत, मनोज चांदुरकर, जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे, हिंमत चतूर, संजय तपासे तसेच दोनही गावचे सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुर कडाजना ते शेगाव कुंड रस्त्याचे मजबुतीकरण, ग्रामपंचायत शेगाव येथील व्यायामशाळा इमारत बांधकाम, स्मशानभूमिच्या शेडचे बांधकाम, रिमडोह येथील समाजभवन बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री श्री.केदार यांच्याहस्ते झाले. शेगाव येथे आयोजित सभेत त्यांनी गावकऱ्यांना संबोधित केले.
आजंती येथे प्रशिक्षण केंद्र बांधकामाचे भुमिपूजन, अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रंथालय इमारतीचे लोकर्पण पालकमंत्र्यांनी केले. आजंती येथे बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत ईमारतीचे लोकार्पणही त्यांनी केले. आजंती येथे बांधण्यात आलेल्या भव्य ग्रामपंचायत ईमारतीसारखीच इमारत अन्य ठिकाणीही असावी, असे पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना संबोधित करतांना सांगितले.
आताच्या महिला शिकलेल्या आहेत. शिकलेली महिला घराला आर्थिकदृष्ट्या हातभार लावू शकते, त्यामुळे त्यांच्या हाताला काम कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आजंती येथे झालेल्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आ.रणजित कांबळे, आ.समिर कुणावार, सुधीर कोठारी, सुनिल राऊत राजेश कोचर यांचीही भाषणे झाली. आजंती येथील गावकऱ्यांनी मागणी केलेली कामे करू असे सांगून काही कामांचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
दोनही गावी झालेल्या विविध कार्यक्रमांना ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
