•विहीर, पाईप लाईन व टाकीचे काम होणार
वर्धा,दि.01: समुद्रपूर तालुक्यातील रासा, तावी आणि केसलापार या गावातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा कामाच्या आराखडयास मंजूरी देण्यात आली आहे. सदर काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.
ग्रामीण भागात शुध्द आणि मुबलक पाणी पुरवठयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या वतीने जलजीवन मिशन राबविण्यात येते. ज्या गावात पाणी पुरवठयाची योजना नाही, अस्तित्वात असलेली योजना पुरेसी नाही, पाणी टंचाईची समस्या आहे किंवा अतिरिक्त पाणी पुरवठयाची सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी या योजनेअंतर्गत कामे मंजूर केली जातात.
समुद्रपूर तालुक्यातील रासा, तावी आणि केसलापार या गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता या तिनही गावाचे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे आराखडे मंजूर करण्यात आले आहे. या आराखडयाप्रमाणे तिनही गावात तातडीने कामे सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना दिले.
या गावांमध्ये पाणी पुरवठयाची पुरेशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी गावांमध्ये विहीर, पाण्याची टाकी व पाईपलाईनची कामे करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कामे तातडीने सुरु करण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
